
रायगड (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हे पक्षावर नाराज असून पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपण पक्षावर किंवा पक्षश्रेष्ठींवर नाराज नसल्याचे स्पष्ट केले. आजारी असल्याने डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला होता, त्यामुळे काही दिवस फोन बंद ठेवून पक्ष कार्यालयात येणे झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. कर्जत-खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस हा क्रमांक एकचा पक्ष असून कर्जत नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद वॉर्डमध्ये पक्षाची एकहाती सत्ता असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच २०२९ ची विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.





