अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग जिल्हा रुग्णालयातील कथित ढिसाळ कारभार, रुग्णांशी गैरवर्तन आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाच्या तक्रारींवरून अलिबाग नगर परिषदेच्या नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून वारंवार तक्रारी येत असल्याने शिष्टमंडळाने रुग्णालयाला भेट देत प्रशासनाला जाब विचारला.
यावेळी काही वैद्यकीय अधिकारी आणि अधिपरिचारिकांकडून रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांशी असंवेदनशील वर्तन होत असल्याचा आरोप करण्यात आला. अतिदक्षता विभागातील काही कर्मचारी रुग्णांच्या नातेवाईकांशी अयोग्य भाषेत संवाद साधत असल्याची तक्रारही मांडण्यात आली.
तसेच काही प्रशिक्षणार्थी महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वयोवृद्ध रुग्णांशी अरे-तुरे भाषेत बोलणे, रुग्ण तपासणीदरम्यान मोबाईलमध्ये व्यस्त राहणे तसेच ऑन ड्युटी असताना धूम्रपान केल्याचे आरोप करण्यात आले. रुग्णालयातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडेही लक्ष वेधण्यात आले.
शिष्टमंडळाने प्रभारी प्रशासकीय अधिकारी डॉ. संगमेश्वर महाजन यांची भेट घेऊन विविध तक्रारी मांडल्या. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक सुधारणा करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. शिष्टमंडळात ॲड. निवेदिता वाघमारे, ॲड. अश्विनी ठोसर, संतोष गुरव, जमालुद्दीन सय्यद आणि रुपाली पेरेकर यांचा समावेश होता.






