अलिबाग (प्रतिनिधी): जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथील आंतररुग्ण इमारतीच्या बाहेरील भागातील नूतनीकरणाच्या कामांदरम्यान रुग्णांच्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरते बंद ठेवण्यात आलेले स्वच्छतागृह आता पुन्हा सुरू करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिले आहेत.
या संदर्भात श्रीमती रुपाली पेरेकर यांनी १२ एप्रिल २०२६ रोजी अर्ज सादर करून रुग्णांच्या नातेवाईकांसाठी स्वच्छतागृह पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांच्या अर्जाची दखल घेत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत हे आदेश जारी केले आहेत.
आदेशानुसार, इमारतीच्या बाहेरील बाजूचे बांधकाम दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने बंद ठेवलेले स्वच्छतागृह आता पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. स्वच्छतागृहाची तात्काळ साफसफाई करून ते रुग्णांच्या नातेवाईकांच्या वापरासाठी खुले करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच स्वच्छतेची नियमित व्यवस्था संबंधित स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वच्छता कोणत्या कर्मचाऱ्याने केली आणि कोणत्या वेळेला केली याची माहिती दररोज फलकावर प्रदर्शित करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निशिकांत पाटील यांनी माझ्या अर्जाचा विचार करून घेतलेल्या निर्णयामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना विशेषतः महिला वर्गाला मोठा दिलासा मिळणार असून, स्वच्छता व सुविधा व्यवस्थेत अधिक शिस्त निर्माण होणार आहे.
: रुपाली पेरेकर. सामाजिक कार्यकर्त्या. अलिबाग





