अलिबाग (प्रतिनिधी): बनावट सोन्याचे दागिने खऱ्या सोन्याचे असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला रायगड पोलिसांनी अटक केली आहे. म्हसळा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली असून आरोपींकडून सुमारे १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(२), ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गंजे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला कमी किमतीत खरे सोन्याचे दागिने विकण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर बनावट दागिने देऊन तब्बल १५ लाख रुपये उकळले. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला.
या प्रकरणी राजस्थान राज्यातील जालोर जिल्ह्यातील पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी सध्या रोहा तालुक्यातील किल्ला परिसरात वास्तव्यास होते. तपासादरम्यान आरोपींना २२ जुलै रोजी अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.
रायगड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, रस्त्यावर अथवा अनोळखी व्यक्तीकडून स्वस्तात सोने खरेदी करण्याच्या आमिषाला बळी पडू नये. सोने खरेदी करताना अधिकृत व नामांकित ज्वेलर्सकडूनच व्यवहार करावेत. तसेच फसवणुकीचा प्रकार घडल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Home ताज्या बातम्या बनावट सोन्याच्या दागिन्यांनी फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी रायगड पोलिसांच्या जाळ्यात






