अलिबाग(प्रतिनिधी) : नागोठणे परिसरातील रिलायन्स कंपनीमधील एका अधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बांधकामाच्या ठेक्याची मुदत वाढवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप संबंधित अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमेश धनावडे असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे. पीडित ३८ वर्षीय महिलेच्या नावावर गटार बांधकामाचा ठेका होता. संबंधित ठेक्याची मुदत संपुष्टात आल्याने मुदतवाढ मिळावी यासाठी ती महिला आपल्या एका महिला नातेवाईकासह रिलायन्स कंपनीच्या बेणसे येथील इस्टेट कार्यालयात गेली होती.
गुरुवारी दुपारच्या सुमारास धनावडे यांच्या केबिनमध्ये ठेक्याच्या मुदतवाढीसंदर्भात चर्चा सुरू असताना त्यांनी महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेनंतर संबंधित महिलेने नागोठणे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
महिलेच्या तक्रारीच्या आधारे नागोठणे पोलिसांनी रमेश धनावडे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदविला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेमुळे औद्योगिक परिसरात एकच खळबळ उडाली असून, प्रकरणाच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





