नवी मुंबई (प्रतिनिधी): स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोदरम्यान महिलांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त टिप्पणीचे प्रकरण आता अधिकच तापले असून त्याला राजकीय रंग चढू लागला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवत प्रणित मोरेवर सडकून टीका केली आहे. “प्रणित मोरेसारखी विकृती आमच्या खारघरमध्ये राहते याची घृणा वाटते,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
काही दिवसांपूर्वी प्रणित मोरे यांच्या एका स्टँडअप शोदरम्यान प्रेक्षकांकडून महिलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती. या वक्तव्यावर प्रणित मोरे यांनी हसून प्रतिक्रिया दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर विविध सामाजिक, राजकीय आणि महिला संघटनांकडून या प्रकाराचा निषेध करण्यात आला. सोशल मीडियावरही संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
वाद वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली. कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा महिलांचा अवमान करण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी खेद व्यक्त केला. मात्र, त्यांच्या या माफीनाम्यानंतरही संतप्त प्रतिक्रिया कायम असून अनेकांनी ही माफी अपुरी असल्याचे मत व्यक्त केले आहे.
याच पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी कठोर भूमिका घेतली आहे. महिलांबाबत अशा प्रकारच्या वक्तव्यांना समाजात कोणतेही स्थान नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक व्यासपीठावरून व्यक्त होणाऱ्या प्रत्येक शब्दाची जबाबदारी संबंधित व्यक्तीने घेतली पाहिजे. विनोदाच्या नावाखाली महिलांचा अपमान अथवा त्यांच्याविषयी चुकीचा संदेश देणारी वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विनोदाची मर्यादा आणि सार्वजनिक व्यक्तींनी सांभाळावयाची सामाजिक जबाबदारी यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावरही या मुद्द्यावर मतमतांतरे व्यक्त होत असून, महिलांचा सन्मान राखत मनोरंजन क्षेत्राने आपली सामाजिक बांधिलकी जपावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
Home ताज्या बातम्या खारघरमध्ये राहणाऱ्या प्रणित मोरेसारख्या विकृतीची घृणा वाटते; आमदार प्रशांत ठाकूर यांचा संताप






