अलिबाग ( प्रतिनिधी):अलिबाग नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदाची धुरा उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांच्याकडे सोपविण्यात आली असून, गुरुवारी (दि. १८ जून) त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी नगरपरिषदेतील पदाधिकारी, अधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
पदभार स्वीकारल्यानंतर अँड. मानसी म्हात्रे यांनी नगरपरिषदेच्या विविध विकासकामांना गती देण्याबरोबरच नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. नगराध्यक्षांच्या अनुपस्थितीत नगरपरिषदेच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या पदभार स्वीकृती कार्यक्रमास वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक, अँड. निलम हजारे, मुख्याधिकारी सागर साळुंखे, पाणीपुरवठा सभापती अनिल चोपडा, महिला व बालकल्याण उपसभापती अँड. अश्विनी ठोसर, नगरसेविका निवेदिता वाघमारे, अँड. ऋषीकेश माळी, माजी नगरसेवक अजय झुंजारराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन अँड. मानसी म्हात्रे यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
अलिबाग नगरपरिषदेच्या थेट निवडून आलेल्या नगराध्यक्ष अक्षया नाईक यांनी काही दिवसांसाठी नगराध्यक्षपदाची जबाबदारी उपनगराध्यक्षा अँड. मानसी म्हात्रे यांच्याकडे सोपविली आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला.
अलिबागचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदभार स्वीकृती सोहळा पार पडला. यावेळी नगरपरिषदेच्या प्रशासनिक कामकाजासह शहरातील विकास प्रकल्प, पायाभूत सुविधा व नागरिकाभिमुख योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली.
नगरपरिषदेच्या कामकाजात सातत्य राखत विकासाभिमुख निर्णयांना प्राधान्य देण्याची भूमिका अँड. मानसी म्हात्रे यांनी व्यक्त केली. त्यामुळे आगामी काळात नगरपरिषदेच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत अधिक वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





