अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग-पेण मार्गावरील कार्लेखिंड घाट उतरताना सागाव बसथांब्याजवळ गुरुवारी सकाळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा अपघात झाला. लोणावळा-अलिबाग या मार्गावरील (एमएच 20 बीएल 691) क्रमांकाची बस रस्त्यावर घसरल्याने (स्लिप झाल्याने) रस्त्याच्या कडेला उतरली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
घटनेनंतर काही काळ परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. घाटातील वळणदार रस्ता आणि पावसामुळे रस्ता ओला झाल्याने बसचा ताबा सुटून ती रस्त्याच्या बाजूला गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चालकाने वेळीच योग्य निर्णय घेत बस नियंत्रित केल्याने बस दरीत कोसळण्याचा अथवा गंभीर अपघात होण्याचा धोका टळला.
या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नसून सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. बस रस्त्याच्या कडेला उतरल्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र नंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
चालकाच्या धाडसी आणि सतर्क कृतीमुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचल्याने प्रवाशांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.





