रायगड (प्रतिनिधी): राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवार, २८ जून रोजी ‘पोलिओ रविवार’ साजरा करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत जन्मापासून ते पाच वर्षांपर्यंतच्या सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब दिले जाणार आहेत. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत आपल्या परिसरातील जवळच्या पोलिओ लसीकरण केंद्र, आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा विशेष पोलिओ बुथवर बालकांना घेऊन जाण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. बालकाला यापूर्वी पोलिओचे डोस दिले असले, तरी या विशेष मोहिमेतील डोस देणे अत्यंत आवश्यक आहे. एकही बालक पोलिओच्या डोसपासून वंचित राहू नये, यासाठी पालकांनी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. पोलिओमुक्त भारताचे उद्दिष्ट कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.





