अलिबाग (प्रतिनिधी): वटपौर्णिमेनिमित्त अलिबाग तालुक्यात सोमवारी सुवासिनींनी पारंपरिक उत्साहात वडाच्या वृक्षाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली. सकाळपासूनच महिलांनी साजशृंगार करून पूजेचे ताट हातात घेत वडाच्या झाडाभोवती सात फेऱ्या मारत विधीवत पूजा केली. आंबे, केळी, फुले, हळद-कुंकू अर्पण करून जन्मोजन्मी हाच पती लाभावा, अशी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून आंब्याचे वाण दिले.
नवविवाहितांसह ज्येष्ठ महिलांनीही मोठ्या श्रद्धेने व्रत पाळले. वयाने मोठ्या सुवासिनींचे आशीर्वाद घेत उखाण्यांच्या माध्यमातून सणाचा आनंद द्विगुणित झाला. पावसाची रिमझिम सुरू असतानाही महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
वटपौर्णिमा हा सण सत्यवान-सावित्रीच्या आख्यायिकेशी निगडित असून वडाच्या दीर्घायुष्याचे प्रतीक मानून पती व कुटुंबाच्या आरोग्यदायी, दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत केले जाते. काही ठिकाणी वडाच्या फांद्या आणून किंवा नव्याने वडाचे रोप लावूनही पूजा करण्यात आली. या परंपरेतून वृक्षसंवर्धनाचा संदेश देत झाडे जपण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.




