अलिबाग तालुक्यात गुटखा साठ्यावर धाड; खंडाळ्यात लाखो रुपयांचा गुटखा जप्त


अलिबाग (प्रतिनिधी) : राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही सुरू असलेल्या अवैध व्यापाराविरोधात अन्न व औषध प्रशासनाने अलिबाग तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायत हद्दीतील नेहुली संगमपाडा येथे गुरुवारी टाकलेल्या धाडीत सुमारे पाच लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरातील गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून अवैध साठेबाजांमध्ये खळबळ उडाली आहे.
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान एका घरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याची पाकिटे, गोळ्या तसेच बॉक्स स्वरूपातील साठा आढळून आला. हा संपूर्ण मुद्देमाल तात्काळ जप्त करून प्रशासनाच्या ताब्यात घेण्यात आला.
या कारवाईसाठी अलिबाग पोलिसांनीही महत्त्वाचे सहकार्य केले. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल सायंकाळपर्यंत सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू होते. तसेच पंचनामा करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचनामा पूर्ण झाल्यानंतर जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचे अचूक मूल्य निश्चित करण्यात येणार असून संबंधितांविरोधात अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच इतर लागू कायद्यांनुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
राज्यात गुटखा विक्री व साठवणुकीवर बंदी असतानाही काही ठिकाणी अवैध मार्गाने गुटख्याचा व्यापार सुरू असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर व्यवसायाविरोधात प्रशासनाची मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अलिबाग तालुक्यातील या धाडीनंतर जिल्ह्यातील गुटखा साठेबाज आणि विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.