अलिबाग–आग्राव बससेवा तातडीने पूर्ववत सुरू करा; राजिप सदस्य डॉ. सचिन राऊळ यांची आग्रही मागणी


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग–आग्राव मार्गावरील राज्य परिवहन (एसटी) बससेवा पुन्हा सुरळीत सुरू करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन राऊळ यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी अलिबाग आगाराशी थेट संपर्क साधून बससेवा बंद असण्यामागील कारणांची सविस्तर माहिती घेतली.
डॉ. राऊळ यांनी सांगितले की, यापूर्वी या मार्गावरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असल्याने बससेवा विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी संबंधित आमदारांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले असून आता वाहतुकीसाठी रस्ता सक्षम आहे.
रस्त्याची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरही बससेवा अद्याप सुरू करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना रोजच्या प्रवासासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असल्याने आर्थिक भारही वाढत आहे.
याबाबत डॉ. राऊळ यांनी अलिबाग आगार प्रशासनाला तातडीने बससेवा पूर्ववत सुरू करण्याचे आवाहन केले असून, नेमकी अडचण कोणती आहे याची स्पष्ट माहिती नागरिकांसमोर मांडण्याची मागणीही केली आहे. रस्ता दुरुस्त झाल्यानंतर बससेवा सुरू न करण्यामागे कोणतेही ठोस कारण उरलेले नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने विलंब न करता अलिबाग–आग्राव बससेवा नियमित सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.
स्थानिक नागरिकांनीही बससेवा लवकरात लवकर सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली असून, प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन ग्रामीण भागातील प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.