अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या उद्देशाने नगरपरिषदेने विशेष स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे. नगराध्यक्षा अक्षया नाईक आणि उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांच्या पुढाकाराने दर शनिवारी शहरातील एका विभागात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत शनिवारी अलिबाग बीच, महावीर चौक ते पीएनपी मच्छी मार्केट परिसरात व्यापक स्वच्छता करण्यात आली. रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक ठिकाणांवरील कचरा हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. आगामी काळात शहरातील सर्व प्रभागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी स्वच्छता ही केवळ नगरपालिकेची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगत नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनी स्वच्छता अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या मोहिमेत नगरसेविका ॲड. अश्विनी ठोसर, नगरसेवक ॲड. ऋषिकेश माळी, नगरसेवक जमालुद्दीन सय्यद, मुख्याधिकारी सागर साळुंखे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांचा सहभाग या त्रिसूत्रीच्या माध्यमातून अलिबागला आदर्श शहर बनविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
Home ताज्या बातम्या ‘स्वच्छ अलिबाग’चा निर्धार; नगराध्यक्षा अक्षया नाईक-उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे यांचा पुढाकार






