अलिबाग (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या नॅशनल ॲक्शन फॉर मेकनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टिम (NAMASTE) उपक्रमांतर्गत १४ जुलै रोजी ‘नमस्ते डे’ निमित्त अलिबाग नगर परिषदेत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा व स्वच्छता अभियानात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात आला.
नगराध्यक्षा अक्षया नाईक व उपनगराध्यक्ष अॅड. मानसी म्हात्रे यांच्या हस्ते स्वच्छता दूतांचा गौरव करण्यात आला. यावेळी अॅड. मानसी म्हात्रे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, त्यांना आधुनिक यंत्रसामग्री, सुरक्षित साधने आणि सन्मानजनक कार्यपरिसर उपलब्ध करून देणे हीच ‘नमस्ते डे’ची खरी भावना असल्याचे सांगितले.
नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या श्रमांचा गौरव करत त्यांच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यास नगर परिषद कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमात स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या निस्वार्थ सेवेला सलाम करत स्वच्छता ही केवळ नगर परिषदेची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश देण्यात आला. या वेळी नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






