अलिबाग (प्रतिनिधी) : कोकण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती बामीबाई नाना पुनकर हायस्कूल, भिलजी-बोरघर (ता. अलिबाग, जि. रायगड) येथे शिक्षक-पालक सुसंवाद सभा व एस.एस.सी. परीक्षा २०२६ मधील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा शाळा समितीचे सभापती मा. श्री. पंडित शेठ पाटील होते. या कार्यक्रमास पालक, विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
यंदाच्या एस.एस.सी. परीक्षेत कु. रचना सुरेश दरोडा हिने ८९.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. जान्हवी प्रमोद शिर्के हिने ८७.४० टक्के गुणांसह द्वितीय, कु. वनश्री समीर पाटील हिने ८२.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. तसेच कु. साची जगदीश ठाकूर हिने ८२.४० टक्के आणि कु. स्वरूप नितीन म्हात्रे याने ८२.२० टक्के गुण मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल केले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक जी. बी. मोहिते सर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये शाळेची शैक्षणिक वाटचाल, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शिक्षक-पालक संवादाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांच्या यशामागील शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे संयुक्त योगदान यावर सविस्तर मार्गदर्शन केले. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच संस्कार, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात मा. पंडित शेठ पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या बळावर मोठी यशे संपादन करावीत, असे आवाहन केले. शिक्षक-पालक यांच्यातील समन्वय हा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा मजबूत पाया असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा म्हात्रे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दीपक रसाळ यांनी केले. यावेळी स्टाफ सेक्रेटरी नूतन हासपाटील, ज्येष्ठ शिक्षक किशोर राठोड, ज्येष्ठ शिक्षिका मुजावर मॅडम, शाळेचा सर्व सेवकवर्ग, शाळा समिती सदस्य नौशाद मुजावर, महेश झावरे, सामाजिक कार्यकर्ते मोहन धुमाळ यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याच कार्यक्रमांतर्गत शाळेच्या विविध समित्यांची स्थापना करण्यात आली. आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शाळेच्या प्रगतीसाठी या समित्या सक्रियपणे कार्य करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा देत आणि शिक्षक-पालकांच्या संयुक्त सहकार्याने शाळेची शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्याचा निर्धार व्यक्त करून करण्यात आला.
Home ताज्या बातम्या भिलजी-बोरघर येथील श्रीमती बामीबाई नाना पुनकर हायस्कूलमध्ये शिक्षक-पालक सुसंवाद सभा व गुणवंत...






