कै. अमृता (कंदा) अरविंद ठोंबरे यांच्या स्मरणार्थ भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात समारोप


अलिबाग(प्रतिनिधी): कै. अमृता (कंदा) अरविंद ठोंबरे यांच्या स्मरणार्थ जय हनुमान मिळकतखार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य-दिव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा २०२६ ला खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक संघांच्या सहभागामुळे स्पर्धा अत्यंत चुरशीच्या आणि रंगतदार वातावरणात पार पडली.

या स्पर्धेला रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा मुख्य प्रतोद मा. श्री. अमितदादा नाईक यांनी प्रमुख उपस्थिती लावून स्पर्धेची शोभा वाढवली. यावेळी आयोजकांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर मा. अमितदादा नाईक यांच्या शुभहस्ते विजेत्या, उपविजेत्या तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना चषक, पारितोषिके व सन्मानचिन्हांचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी खेळाडूंना क्रीडाभावना जपत ग्रामीण भागात अशा स्पर्धांचे आयोजन सातत्याने होत राहावे, अशा शुभेच्छा दिल्या. अशा उपक्रमांमुळे युवकांना खेळासाठी प्रोत्साहन मिळते तसेच सामाजिक ऐक्य अधिक दृढ होते, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी गोरख कडवे, गिरीश कडवे, जगदीश कडवे, गणेश कडवे यांच्यासह ग्रामस्थ, क्रिकेटप्रेमी, खेळाडू आणि परिसरातील अनेक मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.