पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन


कोल्हापूर (प्रतिनिधी): शिक्षणतज्ज्ञ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल तथा पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील (डॉ. डी. वाय. पाटील) यांचे मंगळवारी (दि. ४) कोल्हापूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी महाराष्ट्रासह देशभरात अनेक शैक्षणिक संस्था उभारून शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले. तसेच महापौर ते राज्यपाल अशी विविध महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली होती. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले होते.
त्यांचे पार्थिव बुधवारी (दि. ५) सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कसबा बावडा येथील यशवंत निवास येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, त्यानंतर डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.