बेलापूर (प्रतिनिधी) : यू बिझनेस मिटच्या वतीने बेलापूर येथील बीआरएससीसीएलमध्ये इंडो-थाई बिझनेस कॉरिडोरचे उद्घाटन करण्यात आले. नुकत्याच झालेल्या नवी मुंबई ग्लोबल समिटनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय उद्योजकांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
यू बिझनेस मिटचे संस्थापक वैभव सोनटक्के यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या कॉरिडोरद्वारे एक्सपोर्ट-इम्पोर्ट, मेडिकल टुरिझम, रिअल इस्टेट, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान, मॅन्युफॅक्चरिंग, बँकिंग, फायनान्स आणि कन्स्ट्रक्शनसह विविध क्षेत्रांतील उद्योजकांना थायलंडसोबत व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच भविष्यात मॉरिशस, दुबई आणि अमेरिका या देशांशीही व्यवसायिक सहकार्य वाढविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
यावेळी कॉर्पोरेट बिझनेस सेंटरचाही शुभारंभ करण्यात आला. या माध्यमातून उद्योजकांना अल्प शुल्कात कार्यालयीन सुविधा, कायदेशीर मार्गदर्शन, सरकारी परवाने आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक करारांसाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. थायलंडचे पीआयटीए मुख्य संचालक व थायलंड एम्बसी सल्लागार प्रसर्त पियासाचादेश यांनी ऑनलाइन सहभागी होत उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमात क्रॉस बॉर्डर बिझनेस संधींवर मार्गदर्शन करण्यात आले.





