आढावा बैठकीत संघटनात्मक बांधणीसह आगामी कार्यक्रमांवर चर्चा
अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ तसेच आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उत्साहात स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला. आगामी काळात काँग्रेसची संघटना अधिक सक्षम करण्यासाठी गावागावांत संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दक्षिण रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र ठाकूर यांनी दूरध्वनीवरून मार्गदर्शन केले. पक्षाची विचारधारा आणि ध्येयधोरणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अलिबाग तालुका काँग्रेस अध्यक्ष सुनील थळे, तालुका कार्याध्यक्ष आकाश राणे, सोशल मीडिया विभागाचे दिनेश सोष्टे, अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष साहिल कूर, विनय कडवे, अल्पसंख्याक विभागाचे कार्यक्रमाध्यक्ष मुजफ्फर चौधरी, सुगम अंबुकर, तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे सरचिटणीस ॲड. उमेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आढावा बैठकीत अलिबाग तालुक्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यात आला. आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध कार्यक्रम, जनसंपर्क अभियान, स्थानिक नागरिकांच्या समस्या तसेच त्या सोडविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. गावागावांत पक्षाची संघटना मजबूत करण्याबरोबरच युवक, महिला व नवीन कार्यकर्त्यांना पक्षाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यावर भर देण्याचे ठरविण्यात आले.
कार्यक्रमात विशेष मार्गदर्शन माजी तालुकाध्यक्ष योगेश मगर यांनी केले.
विभागीय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
संघटनात्मक विस्ताराच्या पार्श्वभूमीवर विविध विभागीय पदाधिकाऱ्यांचीही घोषणा करण्यात आली. शहापूर विभागाच्या अध्यक्षपदी ॲड. प्रफुल्ल पाटील (भोला), तर उपाध्यक्षपदी नंदू पाटील व निशिकांत मोकल यांची निवड करण्यात आली.
आंबेपूर विभागाच्या अध्यक्षपदी सुनील पाटील, तर उपाध्यक्षपदी लाभेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. मापगाव विभागाच्या अध्यक्षपदी रवींद्र ठाकूर (काका), तर उपाध्यक्षपदी सतीश म्हात्रे व रवींद्र बेर्डे यांची जबाबदारी सोपविण्यात आली.
थळ विभागाच्या अध्यक्षपदी शेलेश घरत, उपाध्यक्षपदी अरविंद पाटील यांची निवड करण्यात आली. चौल विभागाच्या अध्यक्षपदी अशोक अंबुकर, तर आशीष गोंधळी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
काविर विभागाच्या अध्यक्षपदी भास्कर भोपी, तर उपाध्यक्षपदी प्रकाश घरत यांची नियुक्ती करण्यात आली. चेंढरे विभागाच्या अध्यक्षपदी भूषण योगेश मगर, तर उपाध्यक्षपदी जहींद्र पाटील व प्रकाश देशमुख यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणे, पक्षाचा जनाधार वाढविणे आणि आगामी काळात अलिबाग तालुक्यात काँग्रेसची संघटना अधिक सक्षम करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने काम करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.





