स्वर्गीय डी. वाय. पाटील यांना काँग्रेस नेत्यांची श्रद्धांजली


राजाभाऊ ठाकूर, आकाश राणे व सुनील थळे यांनी कोल्हापुरात सतेज पाटील यांची घेतली भेट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, काँग्रेसचे कार्याध्यक्ष आकाश राणे आणि अलिबाग तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुनील थळे यांनी आज कोल्हापूर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. सतेज पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन स्वर्गीय डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

डॉ. डी. वाय. पाटील यांचे रायगड जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर तसेच ठाकूर परिवाराशी अत्यंत जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध होते. ठाकूर परिवाराच्या सुख-दुःखात डॉ. पाटील नेहमीच सहभागी होत असत. त्यामुळे त्यांच्या निधनाने ठाकूर परिवारासह रायगडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही शोक व्यक्त होत आहे.

स्वर्गीय मधुकर ठाकूर आणि डॉ. डी. वाय. पाटील यांच्यातील स्नेहाचे संबंध राजकीय क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते, तर ते कौटुंबिक जिव्हाळ्याचे होते. या जुन्या ऋणानुबंधांची जपणूक करण्याची परंपरा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, कार्याध्यक्ष आकाश राणे आणि अलिबाग तालुका अध्यक्ष सुनील थळे यांच्या माध्यमातूनही पुढे नेली जात आहे.

ठाकूर परिवाराने काँग्रेसच्या विचारांशी असलेली नाळ कायम जपली आहे. त्याच परंपरेचा आणि जुन्या स्नेहसंबंधांचा सन्मान राखत राजाभाऊ ठाकूर, आकाश राणे आणि सुनील थळे यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन दुःखात सहभागी होत श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदानाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत काँग्रेसच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.