अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग-पेण मार्गावर सागावजवळ मुरूड-मुंबई एसटी बसला अपघात झाला. कार्लेखिंडीच्या वळणावर बस आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याच्या उजव्या बाजूला वळत बॅरिकेट तोडून थेट रस्त्यालगतच्या खड्ड्यात जाऊन अडकली. अपघातावेळी बसमध्ये प्रवासी होते. मात्र सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या मार्गावरील कार्लेखिंडीचे वळण धोकादायक असल्याने येथे वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. बसचा अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे. या घटनेमुळे काही काळ मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. सुदैवाने मोठी दुर्घटना टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.





