जिल्हा पोलीस अधीक्षक अचल दलाल यांचा हिरवा कंदील; नगरपरिषदेच्या बैठकीत वाहतूक आराखडा सर्वसंमतीने मंजूर
अलिबाग(प्रतिनिधी): शहरातील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग आणि अरुंद रस्त्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना आळा घालण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेने तयार केलेल्या वाहतूक आराखड्याच्या अंमलबजावणीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अचल दलाल यांनी या वाहतूक आराखड्याला हिरवा कंदील दिल्यानंतर आता शहरातील प्रमुख रस्त्यांवर पार्किंग, नो-पार्किंग, पे-अँड-पार्क, वन-वे आणि हॉकर्स झोनची व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. काल, मंगळवारी (ता. ११) नगरपरिषदेत झालेल्या बैठकीत वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला.
नगरपरिषदेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
अलिबाग शहरातील वाहतूक कोंडी आणि बेशिस्त पार्किंगला शिस्त लावण्यासाठी नगरपरिषदेने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान सभापती प्रशांत नाईक यांनी वाहतूक आराखडा प्रत्यक्षात यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला आता यश आले असून, आराखड्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांनी या वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन सभापती प्रशांत नाईक यांनी केले आहे.
वाहतूक आराखड्याबाबत झालेल्या दोन्ही बैठकींमध्ये उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनीही आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. अलिबाग शहराला वाहतुकीची शिस्त लागली पाहिजे आणि नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतूक व्यवस्था मिळाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
नगरपरिषदेने शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तयार केलेल्या आराखड्यात तब्बल ४२ रस्ते व मार्गांवर विविध प्रकारच्या वाहतूक व्यवस्था प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार काही रस्त्यांवर सम-विषम पार्किंग, काही ठिकाणी पूर्णपणे नो-पार्किंग, तर काही मार्गांवर पे-अँड-पार्कची सुविधा राहणार आहे. तसेच आवश्यक ठिकाणी हॉकर्स झोन, वन-वे आणि अधिकृत रिक्षा थांबे निश्चित करण्यात आले आहेत.
या रस्त्यांवर सम-विषम पार्किंग
स्टेट बँक ऑफ इंडिया ते श्री. एस. एन. जोशी यांच्या बंगल्यापर्यंतचा रस्ता, स्टेट बँक ऑफ इंडिया ते अलिबाग अर्बन बँक, द्वारका हॉटेल ते डोंगर हॉल, पशुवैद्यकीय दवाखाना ते श्री. जोग यांच्या घरापर्यंतचा रस्ता, ब्राह्मणआळी राम मंदिर ते के. यू. एस. मुख्य कार्यालयीन इमारत, युनियन बँक ते सार्वजनिक वाचनालय, महावीर चौक ते बालाजी नाका, बालाजी नाका ते गावडे ऑप्टिक्स, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते टिळकळ नाका, टिळकळ नाका ते अलिबाग नगरपरिषद कार्यालय आणि शेतकरी भवन ते अशोका सेंटर या मार्गांवर सम-विषम पार्किंग व्यवस्था राहणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जामा मशीद तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महावीर चौक या मार्गांवर हॉकर्स झोन निश्चित करण्यात आला आहे. अलिबाग बीच पाणपोईपासून हॉटेल सी-व्ह्यूपर्यंत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महावीर चौक या मार्गांवर नो-हॉकर्स झोन राहणार आहे.
तहसीलदार कार्यालय ते स्टेट बँक ऑफ इंडिया या रस्त्याच्या उजव्या बाजूस, डोंगर हॉल ते सिव्हिल हॉस्पिटल या रस्त्याच्या उजव्या बाजूस आणि जिजामाता हॉस्पिटल ते सिद्धार्थ नगर या रस्त्याच्या उजव्या बाजूस पे-अँड-पार्कची व्यवस्था करण्यात येणार आहे.
१९ रस्ते नो-पार्किंग
गंगासागर सोसायटी ते जिल्हाधिकारी कार्यालय, ब्राह्मणआळी राम मंदिर ते महावीर चौक, जुनी नगरपरिषद कार्यालय ते सत्कार प्रेस-कामतआळी, मारुती नाका ते द्वारका हॉटेल, चेंढरे मारुती मंदिर ते डॉ. चांदोरकर यांचा दवाखाना, हिराकोट तलावाच्या कंपाउंडबाहेरील बाजू, जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या बाहेरील बाजूचा रस्ता, पोस्ट ऑफिस ते जिल्हा परिषद कार्यालय या रस्त्याची डावी बाजू, क्रीडा भवन मैदान ते अलिबाग बीच कमानीपर्यंतचा रस्ता आणि विलास कपड्यांच्या दुकानापासून चेंढरे मारुती मंदिरापर्यंतचा रस्ता नो-पार्किंग राहणार आहे.
याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महावीर चौक या मार्गाची डावी बाजू आणि महावीर चौक ते हॉटेल रमाकांत या मार्गाचाही नो-पार्किंगमध्ये समावेश आहे.
वन-वे आणि पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था
जिल्हाधिकारी निवासस्थान ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, रा. जि. प. निवासस्थान ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या दोन मार्गांवर वन-वे व्यवस्था लागू करण्यात येणार आहे.
अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेटपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेटपर्यंतच्या रस्त्याच्या डाव्या बाजूस, मुख्य कार्यकारी अधिकारी, रा. जि. प. निवासस्थानालगतच्या रस्त्याच्या उजव्या बाजूस आणि जिल्हा सैनिक बोर्ड कार्यालय ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग करता येणार आहे.
अलिबाग बीच पाणपोईपासून हॉटेल सी-व्ह्यूपर्यंत दोन्ही बाजूस, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील काशिविश्वेश्वर मंदिर ते सावंत ऑप्टिक्स इमारतीच्या बाजूस, गणेश भोजनालयाच्या बाजूस, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापासून स्टेट बँक ऑफ इंडिया पर्यंत दोन्ही बाजूस, श्री. जोग यांच्या घरापासून ब्राह्मणआळी राम मंदिरापर्यंत दोन्ही बाजूस, जिल्हा स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्रापासून चेंढरे मारुती मंदिरापर्यंत आणि हॉटेल रमाकांतपासून बी.के.एम. टॉकीजपर्यंत पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.
रिक्षांसाठीही निश्चित थांबे
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अधिकृत रिक्षा थांबेही निश्चित करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ डाव्या बाजूस, जिल्हा न्यायालयाकडील अंतर्गत रस्त्याच्या डाव्या बाजूस, रामनाथ येथील कल्याण भवनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूस, बी.व्ही.एम. टॉकीजपासून आर.डी.सी.सी. बँक, अलिबाग शाखेकडील अंतर्गत रस्त्यावर, मुख्य रस्त्यापासून पी.एन.पी. मच्छी मार्केटकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर तसेच श्री. नं. ३ मधील वासुदेव कॉम्प्लेक्सकडून हॉटेल लीलॅककडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूस रिक्षा थांबे निश्चित करण्यात आले आहेत.
तसेच डी.आय.सी. कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ डाव्या बाजूस, चेंढरे अ.न.प. शाळा क्रमांक ५ ते कच्छी भवनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूस, शिलकर नाका ते मिरची गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूस, बाजारपेठेतील पापाभाई पठाण चौकाजवळ उजव्या बाजूस, जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ डाव्या बाजूस, अलिबाग बीचजवळील पोलीस चौकीलगत आणि अलिबाग बसस्थानकापासून महावीर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूस रिक्षा थांबे निश्चित करण्यात आले आहेत.
अधिकृत रिक्षा थांब्यांवर एकावेळी पाचपेक्षा अधिक रिक्षा लावता येणार नाहीत. रिक्षा उभ्या करताना रस्त्यावरील वाहतुकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
मालवाहतुकीच्या वेळेलाही बंधने
नव्या व्यवस्थेनुसार शासकीय कार्यालये, शासकीय इमारती तसेच खासगी इमारतींच्या प्रवेशद्वारासमोरील जागा पार्किंगसाठी सोडावी लागणार आहे. तसेच शहरात सकाळी ९ ते दुपारी २ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८.३० या वेळेत अवजड वाहनांद्वारे मालवाहतूक करणे अथवा माल उतरविण्यास बंदी राहणार आहे.
पाट्या, पट्टे आणि वाहतूक चिन्हांनंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी
नगरपरिषदेकडून संबंधित ठिकाणी पार्किंग, नो-पार्किंग, वन-वे, हॉकर्स झोन आदींच्या पाट्या लावण्याबरोबरच रस्त्यावर आवश्यक पट्टे मारण्यात येणार आहेत. जिल्हा वाहतूक विभागाने तयार केलेल्या अधिसूचनेला मंजुरी मिळाल्यानंतर शहरात वाहतूक नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे.
काल झालेल्या बैठकीत नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, मुख्याधिकारी सागर साळुंखे, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी रोहित करवार, अक्षय तुपसुमुद्र, जिल्हा वाहतूक शाखेच्या अधिकारी मीरा बी. लाड, प्रदीप झेमसे तसेच टॅक्सी, मिनी डोअर आणि रिक्षा चालक-मालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
************
“अलिबागची वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध, सुरक्षित आणि अडथळामुक्त करणे हे आमचे ध्येय आहे. आजचा हा वाहतूक आराखडा म्हणजे नियोजनबद्ध अलिबागच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.”
— अक्षया नाईक, नगराध्यक्षा, अलिबाग नगर परिषद




