लोणावळा (श्रावणी कामत): रत्नागिरी/ दापोली मधील:कृषि महाविद्यालय, दापोली येथील ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ‘बिजांकूर’ गटातर्फे मुगीज (जि. रत्नागिरी) येथे भात पिकात युरिया–डीएपी ब्रिकेट्सच्या वापराबद्दल शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. नीता शिगवण यांच्या शेतात झालेल्या या कार्यक्रमाला परिसरातील १० शेतकऱ्यांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रात्यक्षिकादरम्यान पारंपरिक पद्धतीने युरिया वापरल्यास नत्राचे बाष्पीभवन, झिरपणे व वाहून जाण्याने होणारे नुकसान समजावून सांगण्यात आले. त्यावर पर्याय म्हणून ३४% नत्र व १८% स्फुरदयुक्त युरिया–डीएपी ब्रिकेट्स वापरण्याचा सल्ला देण्यात आला. रोपलागवडीनंतर ७ ते १० दिवसांनी, चार रोपांच्या मधोमध ७ ते १० सेंमी खोल ब्रिकेट्स खोचण्याची योग्य पद्धत प्रत्यक्ष दाखवण्यात आली.
ब्रिकेट्स वापराचे प्रमुख फायदे:
उत्पादनात वाढ: मुळांच्या परिसरात खत दिल्याने अन्नद्रव्यांचा हळूहळू व कार्यक्षम पुरवठा होतो, ज्यामुळे फुटवे आणि मुळांची वाढ उत्तम होते.
बचत व सोपेपणा: एका गुंठ्यासाठी सुमारे ६२५ ब्रिकेट्स पुरेशा असतात. यामुळे खताचा अपव्यय टळून खताच्या फेऱ्या, श्रम आणि वेळेची बचत होते.
महत्त्वाची काळजी: ब्रिकेट्स जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा साचलेल्या पाण्यात न फेकता जमिनीत खोलवर पुरणे आवश्यक आहे.
या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी ब्रिकेट्सची स्थापना, योग्य प्रमाण आणि खर्चातील बचत यांबाबत विचारलेल्या विविध प्रश्नांचे तज्ज्ञांनी निरसन केले.
हे प्रात्यक्षिक सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषय विशेषज्ञ अस्लम डोसानी, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिजांकूर गटातील विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.
Home ताज्या बातम्या मुगीज येथे भात पिकात युरिया–डीएपी ब्रिकेट्सचा वापर; शेतकऱ्यांना मिळाले प्रत्यक्ष प्रात्यक्षिक








