रायगड (प्रतिनिधी) : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उत्तराखंड येथील सभेनंतर काही संघटनांकडून करण्यात आलेल्या कथित ‘शुद्धीकरणा’च्या प्रकाराचा रायगड जिल्हा काँग्रेसच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. ही कृती संविधानाच्या मूलभूत मूल्यांना छेद देणारी असून, समाजात जातीय व सामाजिक भेदभावाची मानसिकता वाढविणारी असल्याची टीका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनाला जिल्ह्यातील विविध तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, नेते आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान संबंधित कृतीविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांनी भारतीय संविधानाचा दाखला देत समानता आणि भेदभावमुक्त समाजव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले. “माझ्या हातात संविधान आहे. संविधानातील अनुच्छेद १४ प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देतो, तर अनुच्छेद १५ धर्म, जात, वंश, जन्मस्थान आदी आधारांवर भेदभाव करण्यास प्रतिबंध करतो. अशा परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीच्या उपस्थितीमुळे एखाद्या ठिकाणाचे ‘शुद्धीकरण’ करणे ही कृती अत्यंत चुकीची आणि संविधानाच्या मूल्यांशी विसंगत आहे,” असे ठाकूर यांनी सांगितले.
देशाच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले असून, धर्म, जात आणि समाजघटकांच्या आधारे भेदभावाला कोणतेही स्थान नाही. मात्र, अशा प्रकारच्या कथित कृतींमुळे सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि लोकशाही मूल्यांना धक्का पोहोचतो, असा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.
“खर्गे यांच्या सभेनंतर करण्यात आलेल्या कथित शुद्धीकरणाचा काँग्रेस पक्ष शंभर टक्के निषेध करीत आहे. संविधानाच्या मूल्यांचे रक्षण आणि सामाजिक समतेसाठी काँग्रेस सदैव संघर्ष करेल,” असा निर्धार आंदोलनातून व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष डॉ. मनीष पाटील, माजी तालुकाध्यक्ष योगेश मगर, भारतयात्रा नंदा म्हात्रे, डॉ. सिंग, मितेश कल्याणी, विलास सुर्वे, अशोक मोकळ, समीर ठाकूर, उमेश ठाकूर, आकाश राणे, अभय महामुणकर, अशोक अंबुकर, प्रफुल्ल पाटील, शैलेश घरत, भूषण मगर, सुचित थळे, सतीश म्हात्रे, मेघनाथ पाटील, नाना पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनाच्या शेवटी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संविधानिक मूल्ये, सामाजिक समानता आणि बंधुभाव टिकविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सातत्याने जनजागृती करण्याचे आवाहन केले.









