रायगड (प्रतिनिधी): स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मान मिळाल्यानंतर आता रायगडच्या पालकमंत्री पदाचा मानही आपल्यालाच मिळेल, असा विश्वास राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे. पालकमंत्री पदाच्या नियुक्तीतील सर्व अडथळे दूर झाले असून, हे पद लवकरच आपल्याला मिळेल, असा ठाम दावा त्यांनी केला.
स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोगावले यांनी पालकमंत्री पदाबाबत पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मांडली. “जसा ध्वजारोहणाचा मान मिळाला, तसाच पालकमंत्री पदाचाही मान लवकरच मिळेल,” असे ते म्हणाले.
पालकमंत्री पद मिळण्यास आता कोणताही अडथळा राहिलेला नाही. त्यामुळेच आपण हे ठामपणे सांगत असल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवरही त्यांनी भाष्य केले. रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आमदारांना मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवून पालकमंत्री पदाबाबत नेमकी काय अडचण आहे, याची माहिती घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पालकमंत्री पदावरून रायगडच्या राजकारणात गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पालकमंत्री पदाच्या नियुक्तीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आता मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेतात, याकडे रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.









