आगरी समाज संस्थेतर्फे चिंतामणराव केळकर विद्यालयात करिअर व शैक्षणिक मार्गदर्शन अभियान


अलिबाग(प्रतिनिधी) : आगरी समाज संस्था, अलिबाग यांच्या वतीने ‘करिअर व शैक्षणिक मार्गदर्शन अभियान २०२६–२७’ अंतर्गत चिंतामणराव केळकर विद्यालय, अलिबाग येथे इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर व शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना भविष्यातील विविध करिअर संधींची माहिती देणे, योग्य दिशा दाखवणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आगरी समाज संस्थेचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शक व शैक्षणिक समितीचे प्रमुख मिलिंद धोदरे आणि सौ. शुभांगी म्हात्रे यांचा परिचय करून दिला. त्यानंतर दोन्ही मार्गदर्शकांनी अत्यंत संवादात्मक आणि खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, करिअर नियोजन, स्पर्धा परीक्षा तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांतील संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनातील उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर करत त्यांनी मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. तसेच आगामी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेसाठी प्रोत्साहन म्हणून संस्थेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सेट भेट देण्यात आले.

कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. “आंब्याच्या वृक्षाप्रमाणे तुमचे व्यक्तिमत्त्वही बहरत जावो आणि समाजासाठी फलदायी ठरो,” असा प्रेरणादायी संदेश मान्यवरांनी विद्यार्थ्यांना दिला.

या उपक्रमात इयत्ता ९ वी व १० वीचे एकूण १५४ विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी, ज्ञानवर्धक आणि भविष्याला दिशा देणारा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

शाळेच्या वतीने सुचिता म्हात्रे यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेल्या या उपक्रमाबद्दल चिंतामणराव केळकर विद्यालयाच्या वतीने आगरी समाज संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मार्गदर्शक यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

यावेळी संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक अनंत म्हात्रे, शशिकांत मिठागरी, उपाध्यक्ष सुनिल तांबडकर, सचिव प्रभाकर ठाकूर, सहखजिनदार राजेंद्र पाटील, प्रकाश मिठागरी, अंकुश पाटील तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.