खड्ड्यांवर विद्यार्थिनींचा व्हिडिओ व्हायरल; प्रशासनाची दखल, रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात


रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खांडपे गावातील शाळेत शिकणाऱ्या नेहा ग्हारे, मानसी पवार आणि ज्योत्स्ना मोकळे या तीन विद्यार्थिनींनी गावातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओची प्रशासनाने दखल घेतल्यानंतर रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. विद्यार्थिनींच्या या धाडसाचे कुटुंबीय, ग्रामस्थ तसेच स्थानिक कार्यकर्त्यांकडून कौतुक होत आहे.

खांडपे गावातील शाळेत परिसरातील अनेक गावांमधून विद्यार्थी-विद्यार्थिनी काही किलोमीटर पायी चालत येतात. मात्र, रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि चिखल असल्याने विशेषतः पावसाळ्यात विद्यार्थिनींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. शाळेचा पांढरा गणवेश चिखलाने खराब होणे, कपडे बदलण्यासाठी घरी परत जावे लागणे आणि त्यामुळे शाळेत उशीर होणे, अशा समस्या त्यांना वारंवार सहन कराव्या लागत होत्या.

पर्यटनस्थळ असलेल्या कुंदेवडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची पाहणी करताना या तिघींनी सहजपणे मोबाईलवर व्हिडिओ तयार केला. त्या वेळी हा व्हिडिओ व्हायरल होईल किंवा प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल, असा कोणताही हेतू त्यांचा नव्हता. मात्र, विद्यार्थिनींनी रस्त्यावरील खड्डे आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाची मांडणी केल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरला.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. पावसामुळे यापूर्वी दुरुस्त केलेल्या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले होते. सध्या जीएसबीच्या माध्यमातून खड्डे भरणे, रोलिंग करणे आणि वाहतुकीसाठी रस्ता सुस्थितीत करण्याचे तात्पुरते काम सुरू करण्यात आले आहे. कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार आणि खासदारांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

या विद्यार्थिनींच्या उपक्रमाचे गावातील कार्यकर्त्यांनीही कौतुक केले. ‘जे काम आम्हाला करता आले नाही, ते तुम्ही करून दाखवले,’ अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले. शाळेतील मैत्रिणी त्यांना आता ‘रिपोर्टर’ आणि ‘कॅमेरामन’ अशा नावांनी चिडवत असल्याचेही विद्यार्थिनींनी मिश्कीलपणे सांगितले.

मुलींना केवळ आपल्या गावातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील सर्वच रस्ते चांगले व्हावेत, अशी अपेक्षा आहे. पावसाळ्यात रस्त्यांची कायमस्वरूपी कामे करणे शक्य नसल्याने पावसाळा संपल्यानंतर या रस्त्याचे डांबरीकरण करून कायमस्वरूपी समस्या सोडवावी, अशी त्यांची मागणी आहे.

विशेष म्हणजे, या व्हिडिओनंतर इतर गावांतील लहान मुलेही आपल्या परिसरातील समस्यांकडे लक्ष वेधू लागली आहेत. ग्रामीण भागातील समस्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना माध्यमांनी अधिक महत्त्व द्यावे, अशी अपेक्षाही या तिघींनी व्यक्त केली.

या विद्यार्थिनींची स्वप्नेही वेगवेगळी आहेत. नेहाला यूट्यूबर बनायचे आहे, तर एका विद्यार्थिनीला स्टेनोग्राफर बनण्याचे स्वप्न आहे. ज्योत्स्नाला स्केच आर्टिस्ट बनायचे असून, मुलींचे प्रश्न मांडण्याची आवड असल्याचेही तिने सांगितले. ‘मुली सुरक्षित राहिल्या तर देशही सुरक्षित राहील,’ असा संदेश देत या तिघींनी ग्रामीण भागातील मुलींच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या समस्यांचा मुद्दाही पुढे आणला आहे.

खड्ड्यांनी त्रस्त झालेल्या रस्त्याचा प्रश्न मांडण्यासाठी केलेला साधा व्हिडिओ इतका प्रभावी ठरेल, याची कल्पनाही या तिघींना नव्हती. मात्र, त्यांच्या या छोट्याशा प्रयत्नामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आणि रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाली. त्यामुळे ‘प्रश्न मांडण्यासाठी मोठे व्यासपीठच हवे असे नाही,’ हे या तीन विद्यार्थिनींनी कृतीतून दाखवून दिले आहे.