मुंबई (प्रतिनिधी):श्रीवर्धन, म्हसळा, तळा: या तीन तालुक्यांतील घनकचरा व्यवस्थापनाची कामे गतीने पूर्ण करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रस्तावात ट्रीटमेंट प्लांट, ओल्या कचऱ्याचे कंपोस्टिंग, बायोगॅस प्रकल्प, संरक्षण भिंत, पायाभूत सुविधा व कचरा वाहतुकीसाठी रस्त्यांचा समावेश करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. म्हसळा तालुक्यातील मेटकर्णी येथील अपुऱ्या कचरा व्यवस्थापन जागेचा विस्तार करून भविष्यातील कचऱ्याचे प्रमाण लक्षात घेऊन नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. तळा येथील डम्पिंग ग्राउंडचे कामही तातडीने मार्गी लावण्यास सांगण्यात आले.
श्रीवर्धन येथील बहुउद्देशीय हॉलचा आढावा घेताना दिव्यांगांसाठी स्वतंत्र जागा, सुलभ प्रवेश, आवश्यक उपकरणे व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना तटकरे यांनी दिल्या. सर्व प्रस्ताव अद्ययावत करून संबंधित विभागांनी समन्वयाने कामे तातडीने पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले.









