अलिबाग (प्रतिनिधी) : मेरा युवा भारत, रायगड, प्रिझम सामाजिक विकास संस्था आणि अलिबाग स्पर्धा विश्व अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग शहरात उत्साहपूर्ण वातावरणात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. नाग डोंगरी येथून सुरू झालेली ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोहोचून उत्साहात संपन्न झाली.
या तिरंगा रॅलीचे नेतृत्व राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळी आणि जिल्हा युवा पुरस्कारार्थी तथा स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी यांनी केले.
रॅलीमध्ये मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी झाले होते. हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणा देत युवकांनी अलिबाग शहरातून मार्गक्रमण केले. “भारत माता की जय!”, “वंदे मातरम्!” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. रॅलीदरम्यान युवक-युवतींमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाची भावना प्रकर्षाने दिसून आली.
युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना दृढ करणे, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणे तसेच स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे, हा या तिरंगा रॅलीचा प्रमुख उद्देश होता. उत्स्फूर्त सहभागामुळे रॅलीला विशेष रंगत आली.
राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी ही तिरंगा रॅली अलिबागकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.









