पुरवठा अधिकाऱ्यांसमोर ठेवले तांदळाचे नमुने; राजा केणी यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
रायगड (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील कुर्डुस विभागात सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत नागरिकांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ वितरित केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कुर्डुस विभागातील महिलांनी मंगळवारी तांदळाचे नमुने सोबत घेत थेट रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी आणि जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रसिका केणी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
यावेळी महिलांनी रेशनवर मिळालेल्या तांदळाचा नमुना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसमोर ठेवत या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी केली. निकृष्ट दर्जाच्या तांदळामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी राजा केणी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. रेशनिंगसाठी येणारा चांगल्या दर्जाचा तांदूळ परस्पर व्यापाऱ्यांना विकला जातो, गोदामांमध्ये तांदळाची अदलाबदल केली जाते आणि त्यानंतर निकृष्ट दर्जाचा तांदूळ लाभार्थ्यांच्या माथी मारला जातो, असा गंभीर आरोप त्यांनी केला. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरप्रकारांची चौकशी करून नागरिकांना दर्जेदार धान्य मिळण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, यापुढे निकृष्ट दर्जाचा तांदूळ नागरिकांनी स्वीकारू नये, अशी आक्रमक भूमिका रसिका केणी यांनी घेतली. रेशनिंगच्या धान्याचा दर्जा तपासूनच नागरिकांना धान्य वितरित करावे, अशी मागणी महिलांनी केली.
कुर्डुस विभागातील रेशनिंगच्या तांदळाच्या गुणवत्तेचा प्रश्न जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचल्याने आता प्रशासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते आणि चौकशीतून नेमके काय समोर येते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.









