अलिबाग (प्रतिनिधी) : आमदार भरतशेठ गोगावले यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाले आहे. पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भरतशेठ गोगावले प्रथमच रायगड जिल्ह्यात येत असून, त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या स्वागतासाठी पलसपे फाट्यापासून अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे. आमदार महेंद्रशेठ दळवी, आमदार थोरवे साहेब तसेच जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली होणार असून, सुमारे २०० ते २५० वाहनांचा ताफा सहभागी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिवसैनिक या रॅलीत सहभागी होणार आहेत.
यावेळी जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी सांगितले की, “रायगडच्या सामान्य शिवसैनिकाच्या मनात अनेक वर्षांपासून पालकमंत्रीपदाचे स्वप्न होते. भरतशेठ गोगावले यांच्या नियुक्तीमुळे ते स्वप्न आता साकार झाले आहे. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकाला आपणच पालकमंत्री झाल्याची भावना निर्माण झाली आहे.”
पालकमंत्रीपदामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नव्या उत्साहाची आणि उर्मीची भावना निर्माण झाली असून, या नेतृत्वामुळे रायगडमध्ये शिवसेना आणखी मजबूत होईल, असा विश्वासही राजाभाई केणी यांनी व्यक्त केला. “शिवसेना आजही जिल्ह्यात क्रमांक एकवर आहे आणि भविष्यातही शिवसेना क्रमांक एकवरच राहील,” असा दावा त्यांनी केला.
भरतशेठ गोगावले यांच्या पालकमंत्रीपदामुळे रायगड जिल्ह्यातील विकासकामांना तसेच संघटनात्मक पातळीवर शिवसेनेला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे.







