अलिबाग(प्रतिनिधी): राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCF)च्या थळ युनिटमधील आर.सी.एफ. कॉलनी, कुरुळ परिसरात मराठा आरमाराचे सरसेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांची जयंती श्रद्धापूर्वक आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास RCF थळ युनिटचे कार्यपालक संचालक नितिन हिरडे, कार्यपालक संचालक (प्रकल्प व कॉर्पोरेट समन्वय) ज्योती पाटील, रघुजी आंग्रे, महाप्रबंधक तसेच कंपनीचे विविध वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला RCF कॉलनीतील मुख्य व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भव्य स्मारकातील सरखेल आंग्रे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास गगनभरारी व्यासपीठाच्या (Bucket Hydraulic Platform) साहाय्याने पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राकेश कवळे यांनी केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. कवळे यांनी सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या शौर्य, राष्ट्रनिष्ठा आणि नेतृत्वगुणांचे स्मरण करून आजच्या पिढीने त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. राष्ट्रनिष्ठेतून देशसेवेची भावना, शौर्यातून आत्मविश्वास, नेतृत्वातून कर्तव्यनिष्ठा आणि त्यागातून समर्पणाची प्रेरणा मिळते, असे त्यांनी नमूद केले.
ज्या संस्थेत आपण कार्यरत आहोत, तिच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि एकजुटीने योगदान देणे, हीच सरखेल कान्होजी आंग्रे यांना खरी आदरांजली ठरेल, असा संदेशही त्यांनी दिला.
यावेळी उपस्थित मान्यवर आणि कर्मचाऱ्यांनी सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या अद्वितीय शौर्याचे, कुशल नेतृत्वाचे, अचूक समुद्री युद्धकौशल्याचे आणि उत्तुंग राष्ट्रभक्तीचे स्मरण केले. भारतीय सागरी सीमांचे रक्षण तसेच सशक्त आरमाराच्या उभारणीत सरखेल कान्होजी आंग्रे यांनी बजावलेली ऐतिहासिक भूमिका आजही प्रेरणादायी आहे, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.
सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून त्यांच्या पराक्रमाची आणि राष्ट्रभक्तीची आठवण नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच देशसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि संघभावनेचा संदेश देण्यात आला.









