अलिबाग(प्रतिनिधी) : जनतेच्या विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करून त्यांचा प्रभावीपणे पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने रायगड जिल्ह्यात ‘सेवा अभियान’ राबविण्यात येत आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (ता. २१) अलिबाग येथील भाजप जिल्हा कार्यालयात ‘सेवा अभियान’ उत्साहात पार पडले.
या अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबतची निवेदने सादर केली. नागरिकांच्या अडचणी, शासकीय कामांतील प्रलंबित बाबी तसेच विविध विकासकामांशी संबंधित प्रश्न यावेळी मांडण्यात आले. अभियानात एकूण १०९ निवेदने प्राप्त झाली असून, ही सर्व प्रकरणे संबंधित विभागांकडे पाठवून त्यांचा पाठपुरावा करून मार्गी लावण्याचा संकल्प करण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे ओएसडी श्री. साखरे यांनी यावेळी नागरिकांची निवेदने प्रत्यक्ष स्वीकारली. प्राप्त निवेदनांवर योग्य ती कार्यवाही करून जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमास विधानपरिषद आमदार प्रमोद जठार, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा पाटील, जिल्हा सरचिटणीस ॲड. महेश मोहिते यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘सेवा अभियान’च्या माध्यमातून जनतेच्या समस्या थेट ऐकून घेण्याबरोबरच त्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. जनतेची सेवा, जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष आणि जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा हाच भारतीय जनता पक्षाचा संकल्प आहे, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.









