रायगड-अलिबाग (जिमाका): गणेशोत्सव काळात नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी वीज, पाणी, वाहतूक, सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन करून उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात, अशा सूचना पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिल्या.
जिल्हा नियोजन भवन येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांची माहिती देणारे दिशादर्शक फलक लावावेत. बिघडलेली वाहने तातडीने हटविण्यासाठी क्रेन, तसेच टप्प्याटप्प्याने रुग्णवाहिका उपलब्ध ठेवाव्यात. प्रवाशांसाठी पाणी व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश गोगावले यांनी दिले.
आदिती तटकरे यांनी शांतता समिती सदस्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन तातडीने पूर्ण करून ओळखपत्रे देण्याच्या सूचना केल्या. स्थानिक खासगी रेस्क्यू टीम्सशी समन्वय साधण्याचेही त्यांनी सांगितले. वाहतूक कोंडीच्या ठिकाणी सुविधा केंद्रे वाढवून तात्पुरती सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून द्यावीत. दहीहंडीला सुरक्षा उपाययोजना, विशेषतः सेफ्टी बेल्टची उपलब्धता, अनिवार्य करूनच परवानगी द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवासाठी 7 पोलीस उपनिरीक्षक, 128 पोलीस अधिकारी, 1,900 पोलीस अंमलदार, 400 होमगार्ड आणि एसआरपीएफची एक कंपनी तैनात करण्यात येणार आहे. महामार्गासाठी 25 मोटारसायकल, 20 टोईंग क्रेन आणि 20 रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
खारपाडा, खारेपाटण, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड, महाड एमआयडीसी आणि पोलादपूर येथे सुविधा केंद्रे उभारण्यात येणार असून, येथे पाणी, वैद्यकीय व पोलीस मदत कक्ष, महिला-बालकांसाठी सुविधा आणि वाहनांसाठी आवश्यक सेवा उपलब्ध राहणार आहेत.









