पनवेल (प्रतिनिधी): पनवेल परिसरातील गव्हाण गावातील घरात एकटी राहणाऱ्या ५३ वर्षीय महिलेवर मध्यरात्री चाकू रोखून तब्बल ९ लाख रुपयांचा जबरी दरोडा टाकणाऱ्या टोळीचा उल्वे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चोरट्यांनी घराचे कौल काढून छतामधून घरात प्रवेश करत महिलेच्या गळ्याला चाकू लावला आणि सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता. या थरारक गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ८ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १८ ऑगस्ट रोजी पहाटे अडीच ते साडे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महिला गव्हाणगाव येथे घरात एकट्याच राहत असल्याची माहिती आरोपींना होती. याचाच फायदा घेत त्यांनी घराच्या कौलातून प्रवेश करून चाकूच्या धाकावर दरोडा टाकला. यात सुमारे ७ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २ लाख रुपये रोख असा एकूण ९ लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान पथकाने बदलापूर येथे जाऊन रोहित शांताराम मालुसरे वय वर्ष २७ आणि सुरज राजू गायकवाड वय वर्ष १९ यांना दरोड्यात वापरलेल्या कारसह ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून गव्हाण गावातील दीपेश सुरेश भोईर वय वर्ष २३ , प्रवीण सदानंद कोळी वय वर्ष ३१ आणि फरहान अल्ताफ शेख वय वर्ष १९ यांचा सहभाग उघडकीस आला.
अटक आरोपी रोहित मालुसरे याच्यावर MMR परिसरात चोरी, जबरी चोरी, घरफोडी आणि हत्यार बाळगण्याचे तब्बल १७ गुन्हे दाखल आहेत. सुरज गायकवाड याच्यावरही घरफोडीचे दोन आणि अहिल्यानगर येथे गंभीर गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. धक्कादायक बाब म्हणजे, गुन्ह्यातील ३ आरोपी त्याच गव्हाण गावातील असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान, पोलिसांनी होंडा जॅझ कार, KTM बाईक, ॲक्सेस स्कूटी, चार महागडे मोबाईल आणि १० हजार रुपये रोख असा ८ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्ह्यातील आणखी चार आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. तसेच उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी तपास सुरू आहे.









