अलिबागच्या मानाच्या दहीहंडीचा ५ सप्टेंबरला थरार


अलिबाग (प्रतिनिधी) : शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत आणि प्रशांत नाईक मित्र मंडळ आयोजित ‘दहीहंडी उत्सव २०२६’ची तयारी जोरात सुरू आहे. शेतकरी भवन येथे ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता दहीहंडीचा थरार रंगणार आहे. उत्सवातील ‘अलिबागची मानाची दहीहंडी’ ट्रॉफीचे अनावरण उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

यंदाच्या स्पर्धेसाठी आतापर्यंत ३० पुरुष आणि २५ महिला गोविंदा पथकांनी नोंदणी केली आहे. पुरुष विजेत्या पथकाला ट्रॉफीसह २ लाख ५१ हजार रुपये, तर महिला पथकाला ट्रॉफीसह १ लाख १ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. पाच व सहा थरांसाठी पुरुष पथकांना अनुक्रमे ५ व ११ हजार रुपये, तर महिला पथकांना चार व पाच थरांसाठी अनुक्रमे ५ व ११ हजार रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

उत्सवानिमित्त आयोजित रील्स स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत ३० स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ११ हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यामुळे अलिबागच्या मानाच्या दहीहंडीतील गोविंदा पथकांची चुरस पाहण्यासाठी अलिबागकरांचे लक्ष ५ सप्टेंबरकडे लागले आहे.