शेकापकडून तीव्र संताप; जिल्हा शल्यचिकित्सकांना घेराव घालत प्रशासनाला जाब
अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या अंगावर स्लॅबचा काही भाग कोसळून तो जखमी झाल्याची गंभीर घटना घडली आहे. सुनील आवरे असे जखमी रुग्णाचे नाव आहे. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, रुग्णालय प्रशासनाच्या कारभाराविरोधात शेतकरी कामगार पक्षाने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील आणि उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा रुग्णालयात जाऊन पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधण्यात आला. रुग्णालयाच्या इमारतीची दुरवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतही पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे विचारणा केली.
रुग्णाच्या अंगावर स्लॅब कोसळून तो जखमी होण्यासारखी गंभीर घटना घडल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाकडून त्याची पुरेशी दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेकापच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांच्या दालनात जाऊन त्यांना घेराव घातला. रुग्णालयातील दुरवस्थेबाबत प्रशासनाला जाब विचारत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी चित्रलेखा पाटील यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावरही निशाणा साधला. “जनतेचे प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष करून काहीजण गौतमी पाटीलला नाचवण्यात धन्यता मानत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला. जिल्हा रुग्णालयासारख्या महत्त्वाच्या आरोग्य संस्थेच्या इमारतीच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, रुग्णालयातील या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मानसी म्हात्रे यांनी केली. रुग्णांच्या जीविताशी संबंधित असलेल्या अशा गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांनी रुग्णाच्या अंगावर स्लॅबचा भाग कोसळल्याची घटना घडल्याचे मान्य केले. मात्र, घटनेनंतर प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या या घटनेमुळे रुग्णालयाच्या इमारतीची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.









