अलिबाग(प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या वतीने अलिबागमध्ये यंदा ‘भाजपा दहीहंडी २०२६’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक जल्लोषासोबतच सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची मेजवानी या उत्सवात नागरिकांना अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे पुरुष आणि महिला गटातील अंतिम विजेत्या गोविंदा पथकांना प्रत्येकी २ लाख ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती भाजपाचे रायगड जिल्हा सरचिटणीस ॲड. महेश मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंदा स्पर्धेतील बक्षिसांच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. पुरुष गटातील अंतिम विजेत्या पथकाला २ लाख ५१ हजार रुपये, तर महिला गटातील अंतिम विजेत्या पथकाला देखील १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. गतवर्षी पुरुष विजेत्या पथकाला २ लाख २२ हजार २२२ रुपये, तर महिला विजेत्या पथकाला १ लाख ११ हजार रुपये देण्यात आले होते. याशिवाय पुरुषांच्या सहा थरांच्या सलामीसाठी प्रत्येक पथकाला ११ हजार रुपये, तर महिलांच्या पाच थरांच्या सलामीसाठी प्रत्येक पथकाला ७ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
चेंढरे येथे प्रशस्त मैदानावर आयोजन
दहीहंडी उत्सवासाठी यंदा स्थळात बदल करण्यात आला आहे. यापूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागात दहीहंडीचे आयोजन करण्यात येत होते. मात्र, या परिसरात नवीन बांधकामे झाल्याने जागेची कमतरता भासत होती. त्यामुळे गोविंदा पथकांसह प्रेक्षकांची सुरक्षितता आणि गैरसोय टाळण्यासाठी यंदाचा उत्सव चेंडरे येथील बावनकुळे यांच्या सभेसाठी वापरण्यात आलेल्या प्रशस्त मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.
पोवाडे, गायनासह शरीरसौष्ठवाचे आकर्षण
दहीहंडी उत्सवाला पारंपरिक आणि सांस्कृतिक स्वरूप देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शाहीर सम्राट चंद्रकांत माने आणि शाहीर माळी यांच्या पोवाड्यांसह लोककलेचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. पार्श्वगायक चेतन लोखंडे यांच्या गायनाची मेजवानीही नागरिकांना मिळणार आहे.
तरुणांमध्ये व्यायाम आणि शरीरसौष्ठवाबाबत जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शरीरसौष्ठवपटू आणि ‘भारत श्री’ निलेश दगडे यांचे मार्गदर्शन तसेच शरीरसौष्ठव प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
७० ते ७५ गोविंदा पथकांचा सहभाग अपेक्षित
अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघातील गोविंदा पथकांसाठी हा उत्सव आयोजित करण्यात आला असून, परिसरातील सुमारे ७० ते ७५ नामांकित गोविंदा पथके सहभागी होण्याची शक्यता आहे. उत्सवाचे नियोजन, नियम आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक बाबींवर चर्चा करण्यासाठी सर्व गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींची बैठक २ तारखेला सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
दहीहंडी उत्सव पारंपरिक उत्साहात, शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी आयोजकांकडून नियोजन करण्यात येत आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच दहीहंडी उत्सवाच्या आयोजनाशी संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, नगरसेवक ॲड अंकित बंगेरा, पंचायत समिती सदस्य प्रियदर्शनी पाटील, माजी उपसरपंच यतीन घरत, दामले, तालुका अध्यक्ष अशोक वारगे आदी उपस्थित होते.









