रायगड जिल्ह्यात सरावादरम्यान प्रथमच नऊ थर रचण्याचा मान; दहीहंडीपूर्वीच पथकाची दमदार तयारी
अलिबाग(प्रतिनिधी) : दहीहंडी उत्सवाची चाहूल लागली असतानाच अलिबागमधील प्रसिद्ध मरिआई मेटपाडा गोविंदा पथकाने सरावादरम्यान मानवी मनोऱ्याचे तब्बल नऊ थर रचत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. रायगड जिल्ह्यात सरावाच्या वेळी प्रथमच नऊ थरांचा मनोरा रचण्यात या गोविंदा पथकाला यश आले आहे. बुधवारी, २ सप्टेंबर रोजी झालेल्या नियमित सरावादरम्यान पथकातील गोविंदांनी कौशल्य, शिस्त, समन्वय आणि धाडसाचे दर्शन घडवत ही विक्रमी कामगिरी साकारली.
यंदा मरिआई मेटपाडा गोविंदा पथकाचे हे २२वे वर्ष आहे. गोपाळकाला आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून पथकाचा नियमित आणि कसून सराव सुरू आहे. याच सरावातून पथकाने यंदा अधिक उंची गाठण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार टप्प्याटप्प्याने नऊ थर रचण्याचा सराव करण्यात आला.
बुधवारी सरावादरम्यान गोविंदांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मानवी मनोरा उभारण्यास सुरुवात केली. एकामागून एक थर रचत अखेर शेवटचे चार गोविंदा अर्थात ‘एक्के’ थरावर पोहोचले आणि नऊ थरांचा मनोरा यशस्वीरीत्या पूर्ण झाला. या क्षणी उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी आणि गोविंदा मोठ्या उत्साहात जल्लोष करताना दिसले.
विशेष म्हणजे, या पथकाने यापूर्वी तब्बल चार वेळा आठ थर रचण्याचा विक्रम केला आहे. मात्र, यंदा सरावातच नऊ थरांचा मनोरा रचत पथकाने आपल्या मागील कामगिरीवर मात केली आहे. या यशामागे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला नियमित सराव, गोविंदांमधील समन्वय, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि पथकाची शिस्तबद्ध तयारी महत्त्वाची ठरली आहे.
मरिआई मेटपाडा गोविंदा पथकाच्या या दमदार कामगिरीची माहिती मिळताच अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून पथकावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सरावातच नऊ थर रचण्यात यश मिळाल्याने यंदाच्या दहीहंडी उत्सवात पथकाकडून आणखी मोठ्या कामगिरीची अपेक्षा निर्माण झाली आहे.
आता प्रत्यक्ष दहीहंडीच्या मैदानावर मरिआई मेटपाडा गोविंदा पथक किती उंची गाठते आणि आपल्या या विक्रमी सरावाची पुनरावृत्ती करते का, याकडे गोविंदा प्रेमींसह संपूर्ण रायगडचे लक्ष लागले आहे.









