राजिप आरोग्य विभाग राबविणार ‘धन्वंतरी आरोग्य अभियान
अलिबाग(प्रतिनिधी): कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होत असते. अशा वेळी साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होउ नये यासाठी, रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ‘धन्वंतरी आरोग्य अभियान’ राबविण्यात येणार आहे. या संदर्भात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामपंचायती व संबंधित यंत्रणा समन्वयाने अभियान राबविणार आहेत.
रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने चाकरमानी, नागरिकांची ये- जा सुरू असते. या काळात पावसाळी वातावरण, ठिकठिकाणी साचलेले पाणी, अस्वच्छता, डासांची पैदास होण्यास पोषक परिस्थिती निर्माण झाल्याने डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, अतिसार, कावीळ, टायफाॅईड, लेप्टोस्पायरोसिस यांयारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता असते. त्यामुळेच उत्सवाच्या काळातही नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे व तातडीने उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने ‘धन्वंतरी आरोग्य अभियान’ राबविण्यात येणार आहे.
रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी उत्साहाने व आरोग्यपूर्ण गणेशोत्सव साजरा करावा, यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने दक्षता घेण्यात येत आहे. सर्व ग्रामीण, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयात सर्व औषध साठा तसेच वैद्यकीय टीम सज्ज असणार आहे. नागरिकांनी व गणेशोत्सव मंडळांनी आपले गणेशोत्सव काळात करण्यात येणा-या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन राजिप अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. रूपाली सातपुते, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. दयानंद सुर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. निशिकांत पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयेश गोसावी, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. दामोदर मोरे यांनी केले आहे.
विशेष आरोग्य पथके: मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांमध्ये विशेष आरोग्य पथक तैनात ठेवण्यात येणार आहे. या पथकाद्वारे प्राथमिक उपचार करण्यात येणार आहेत. गर्दीची ठिकाणी उदा. एसटी डेपो, बाजारपेठा, गणेश मंडळ परिसर अशा भागामध्ये स्वच्छतेच्या संदर्भात पाहणी, गर्दीच्या ठिकाणी औषध फवारणी, डेंग्यू व मलेरिया निदानासाठी आवश्यक तपासणी किट उपलब्ध करून योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे.
व्यापक जनजागृती: ग्रामपंचायत स्पतरापासून जिल्हा स्तरावर आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, आशासेविका यांच्यामार्फत साथीच्या रोगांची लक्षणे, त्यावरील उपचार, खबरदारीच्या उपाययोजना याबबात व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. गणेश मंडळांकडून ध्वनिक्षेपकावर साथरोगांबाबत माहिती देण्यात यावी तसेच सोश मीडियावर जनजागृती करण्यात येणार आहे.
गणेश मंडप परिसर व सार्वजिनक स्वच्छता: सर्व गणेशात्सव मंडळांना त्यांच्या मंडप परिसरात पाणी साचू न देणे, कच-याची नियमितपणे योग्य ती विल्हेवाट लावणे, स्वच्छता राखणे, पिण्याच्या पाण्याची शुद्धता राखणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच संबंधित ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिकांच्या सहाकार्याने स्वच्छता राखणे, पिण्याच्या पाण्याची तपासणी करून घेण्यासह मंडपांमध्ये जनजागृतीपर फलक लावण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.









