मानाची आणि कान्होबाची हंडी एकत्र लावून पारंपरिक पद्धतीने फोडण्याची प्रथा आजही कायम
अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग शहरातील चेंढरे गावातील दहीहंडी उत्सवाला तब्बल दीडशे वर्षांची समृद्ध परंपरा लाभली आहे. काळ बदलला, दहीहंडी उत्सवाला शहरांमध्ये स्पर्धात्मक स्वरूप आले, उंचच उंच मानवी मनोरे रचण्याची चुरस वाढली; मात्र चेंढरेकरांनी आपल्या गावची पारंपरिक दहीहंडीची प्रथा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने जपली आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दह्याने पूर्ण भरलेली मानाची दहीहंडी फोडली जाते. या हंडीला गावात विशेष महत्त्व असून, पिढ्यान्पिढ्या ही परंपरा पुढे नेली जात आहे. त्यानंतर गोपाळकाला उत्सवाच्या दिवशी गावातील प्रत्येक घरातून एक हंडी आणण्याची प्रथा आहे. या हंड्यांमध्ये मानाची हंडी आणि कान्होबाची हंडी यांचाही समावेश असतो. सर्व हंड्या एकत्रितपणे लावल्यानंतर गावातील नागरिक पारंपरिक पद्धतीने त्या फोडतात.
विशेष म्हणजे, शहरांतील दहीहंडीप्रमाणे येथे मोठ्या स्पर्धा, बक्षिसांची चुरस किंवा उंच मनोरे उभारण्यावर भर नसून, सामूहिक सहभागातून उत्सव साजरा करण्याला अधिक महत्त्व दिले जाते. गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि बालगोपाल या उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे दहीहंडी हा केवळ धार्मिक उत्सव न राहता गावकऱ्यांना एकत्र आणणारा सामाजिक आणि सांस्कृतिक सोहळा ठरतो.
शनिवारीही चेंढरेकरांनी ही दीडशे वर्षांची परंपरा मोठ्या उत्साहात साजरी केली. पारंपरिक पद्धतीने हंड्या फोडताना गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, आधुनिक दहीहंडी उत्सवाच्या झगमगाटापासून दूर राहून तरुण पिढीही या जुन्या परंपरेत सहभागी होत असल्याने चेंढरे गावची सांस्कृतिक परंपरा पुढील पिढीकडे सुरक्षितपणे हस्तांतरित होत असल्याचे दिसून आले.
आज शहरांमध्ये दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने विविध गोविंदा पथकांमध्ये मानवी मनोऱ्यांच्या थरांची स्पर्धा रंगते. मात्र, ग्रामीण भागातील अशा पारंपरिक उत्सवांमधून सणाचे मूळ स्वरूप, गावकऱ्यांमधील एकोपा आणि सांस्कृतिक वारसा जपला जात आहे. चेंढरे गावातील दीडशे वर्षांची दहीहंडी परंपरा ही त्याचेच एक आदर्श उदाहरण ठरत आहे.









