दहीहंडीच्या बक्षिसांतही स्त्री-पुरुष समानता हवी – चित्रा पाटील


अलिबाग (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य-दिव्य रायगड राजधानी दहीहंडी सोहळ्यात स्त्री-पुरुष समानतेचा महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश देत भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा चित्रा पाटील यांनी दहीहंडी आयोजकांसमोर एक आगळावेगळा आणि विचार करायला लावणारा मुद्दा मांडला.

यावेळी बोलताना चित्रा पाटील म्हणाल्या, “आपण व्यासपीठावरून नेहमी स्त्री-पुरुष समानतेची भाषा करतो. मात्र, ही समानता केवळ भाषणापुरती मर्यादित न राहता ती प्रत्यक्ष कृतीतही दिसली पाहिजे. दहीहंडी हा केवळ मनोरंजनाचा किंवा साहसाचा खेळ नाही, तर तो एकजूट, परस्पर विश्वास, संघटनशक्ती, धैर्य आणि सामूहिक प्रयत्न यांचे प्रतीक आहे.”

दहीहंडीच्या थरांवर थर रचत उंची गाठण्यासाठी प्रत्येक गोविंदाचा एकमेकांवर विश्वास असणे आवश्यक असते. आज याच साहसी खेळामध्ये महिला गोविंदा पथकेही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. अनेक तरुणी आणि महिला अत्यंत धाडसाने दहीहंडी फोडण्याचे आव्हान स्वीकारत आहेत. त्यामुळे महिलांना सहभागी होण्याची संधी देतानाच त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आणि बक्षिसांमध्येही समानता असणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

“महिला गोविंदा पथकांना पुरुषांप्रमाणेच संधी मिळत असेल, त्या त्याच उंचीचे थर रचण्यासाठी साहस करत असतील आणि त्याच स्पर्धेत सहभागी होत असतील, तर त्यांच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन आणि पारितोषिकही समान असायला हवे. सहभाग समान असेल, मेहनत समान असेल, आव्हान समान असेल तर सन्मानही समान असला पाहिजे,” असे आवाहन चित्रा पाटील यांनी केले.