२४ वर्षांची परंपरा, मरीआई मेटपाडाची नऊ थरांची विक्रमी सलामी; प्रशांत नाईक मित्रमंडळाची ‘मानाची दहीहंडी’ दिमाखात
अलिबाग (प्रतिनिधी): डीजेचा दणदणाट, गोविंदांचा जल्लोष आणि दहीहंडी फोडण्यासाठी सुरू असलेली थरारक चुरस यामुळे रात्री उशिरापर्यंत अलिबागमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मध्यरात्रीनंतरही गोविंदा पथकांचा उत्साह कायम राहिला. अखेर पहाटे ३ वाजून २६ मिनिटांनी मरीआई मेटपाडा पुरुष गोविंदा पथकाने सात थर रचत दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला. यात विशेष बाब म्हणजे मरीआई मेटपाडा संघाने तब्बल नऊ थरांची विक्रमी सलामी देत रायगड जिल्ह्यात प्रथमच असा विक्रम नोंदवला. ‘मानाची दहीहंडी’च्या २४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच नऊ थरांची सलामी देण्यात आली. पुरुष गटात मरीआई मेटपाडा गोविंदा पथकाने, तर महिला गटात भोनंग महिला गोविंदा पथकाने प्रथम क्रमांक पटकावला.
शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक आघाडी पुरस्कृत आणि प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित ‘मानाची दहीहंडी उत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडला. गेल्या २४ वर्षांपासून सुरू असलेल्या या उत्सवाने यंदा नऊ थरांच्या विक्रमी सलामीमुळे नवा टप्पा गाठला. पुरुष आणि महिला गोविंदा पथकांसाठी स्वतंत्र स्पर्धा घेण्यात आल्याने दोन्ही गटांना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली.
पुरुष गटातील स्पर्धेत मरीआई मेटपाडा गोविंदा पथकाने सुरुवातीला तब्बल नऊ थरांची सलामी देत उपस्थितांची मने जिंकली. रायगड जिल्ह्यात प्रथमच नऊ थरांची सलामी देण्याची ही कामगिरी ठरली. त्यानंतर पथकाने सात थरांची रचना करत दहीहंडी फोडली. या विक्रमी कामगिरीमुळे मरीआई मेटपाडा पथकाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. पुरुष गटातील विजेत्या पथकाला २ लाख ५१ हजार रुपये आणि मानाचा चषक देऊन गौरविण्यात आले.
महिला गटाची स्पर्धाही उत्साहात पार पडली. भोनंग महिला गोविंदा पथकाने प्रथम क्रमांक पटकावत आपल्या कौशल्याची आणि आत्मविश्वासाची छाप उमटवली. महिला गोविंदांच्या सहभागामुळे उत्सवाला आणखी व्यापक स्वरूप मिळाले. विजेत्या महिला पथकाला १ लाख १ हजार रुपये आणि मानाचा चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
विक्रमी थरांना विशेष बक्षिसांची दाद देत प्रशांत नाईक यांनी गोविंदांचा उत्साह वाढवला. नऊ थरांची सलामी देणाऱ्या मरीआई मेटपाडा पथकाला एक लाख रुपये, आठ थर रचणाऱ्या कोळीवाडा गोविंदा पथकाला ५० हजार रुपये, तर सहा थर रचणाऱ्या पोहरादेवी-शास्त्रीनगर महिला पथकाला २१ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक प्रशांत नाईक यांच्या वतीने देण्यात आले.
पहाटे ३.२६ वाजता दहीहंडी फोडण्यात यश मिळताच परिसरात एकच जल्लोष झाला. प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत गोविंदांच्या धाडसाला दाद दिली. नऊ थरांची सलामी आणि त्यानंतर सात थरांवर दहीहंडी फोडण्याची कामगिरी हा यंदाच्या उत्सवातील सर्वाधिक चर्चेचा क्षण ठरला.
दहीहंडी फुटल्यानंतर आयोजक प्रशांत नाईक यांनी विजेत्या पथकांसह सर्व सहभागी गोविंदा पथकांचे अभिनंदन केले. नऊ थरांची विक्रमी सलामी देणाऱ्या मरीआई मेटपाडा पथकाचे विशेष कौतुक करत त्यांनी गोविंदांच्या मेहनतीला, धाडसाला आणि एकजुटीला दाद दिली. महिला गटातील विजेत्या भोनंग पथकाचेही त्यांनी अभिनंदन केले. यावेळी गोविंदा, कार्यकर्ते आणि उपस्थितांनी प्रशांत नाईक यांच्यासोबत जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला.
रात्री उशिरापर्यंत दहीहंडी स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. डीजेच्या दणदणाटात आणि गोविंदांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. पहाटेपर्यंत उत्साह कायम राहिल्याने यंदाच्या दहीहंडीने अलिबागकरांना थरारक अनुभव दिला. विविध मान्यवरांच्या हस्ते विजेत्या पथकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्ष मानसी म्हात्रे, शेकापच्या राज्यप्रवक्त्या चित्रलेखा पाटील, सुप्रिया पाटील, नृपाल पाटील, प्रदीप नाईक, नगरसेविका अश्विनी ठोसर, निवेदिता वाघमारे, नीलम हजारे, योजना पाटील, जमाल सय्यद, ऋषिकेश माळी यांच्यासह अन्य नगरसेवक आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
रायगडमध्ये पहिल्यांदाच नऊ थरांची विक्रमी सलामी, सात थरांवर दहीहंडी फोडण्याचा मान आणि महिला गटाचा दमदार सहभाग या वैशिष्ट्यांमुळे प्रशांत नाईक मित्रमंडळाची २४ वर्षांची ‘मानाची दहीहंडी’ यंदा विशेष ठरली.









