वावे नाक्यावरील कचऱ्याचा प्रश्न गंभीर; ग्रामपंचायतीने तत्काळ उपाययोजना करावी


अलिबाग(प्रतिनिधी): अलिबाग–रोहा मार्गावरील वावे नाका परिसरात रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यासह वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढती लोकसंख्या, नाक्यावरील दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांच्या तुलनेत कचरा व्यवस्थापनाची पुरेशी व्यवस्था नसल्याने हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे व्यापारी संघटनेबरोबरच ग्रामपंचायतीनेही याबाबत तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवासी ॲड. राकेश नारायण पाटील यांनी केली आहे.

पूर्वी वावे नाक्याजवळील अलिबाग–रोहा मार्गालगत वावे गावच्या गुरांना चरण्यासाठी तसेच मुलांना क्रिकेट खेळण्यासाठी जागा उपलब्ध होती. या परिसरालगत असलेल्या डोंगराच्या ओहळात कचरा टाकला जात असल्याचेही सांगण्यात येते. मात्र, वनविभागाने झाडे लावण्याच्या कारणास्तव ग्रामस्थांच्या वहिवाटीची जागा ताब्यात घेतल्याने गुरे चरण्यासाठी तसेच मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध असलेल्या जागेवरही परिणाम झाला आहे. त्यातच या परिसरात मोठ्या बंगल्यांची उभारणी झाल्याने ग्रामस्थांच्या वापरातील जागेचा प्रश्न अधिकच गंभीर झाल्याचे ॲड. पाटील यांनी म्हटले आहे.

मात्र, या पार्श्वभूमीवरही वावे नाक्यावरील सध्याच्या कचरा व्यवस्थापनाच्या समस्येकडे दुर्लक्ष करता येणार नाही. नाक्यावरील दुकाने आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य व्यवस्था करणे ही संबंधित दुकानदार, व्यापारी तसेच ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. कचरा रस्त्याच्या कडेला किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकण्याऐवजी त्याचे नियमित संकलन व योग्य पद्धतीने व्यवस्थापन होणे आवश्यक आहे.

विशेषत रात्रीच्या वेळी रस्त्यालगत टाकलेल्या कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढत असून, वाहनचालकांसाठी हा धोका ठरू शकतो. अचानक रस्त्यावर येणाऱ्या कुत्र्यांमुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसेच साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी, अस्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे वावे नाक्यावरील कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीचे प्रशासक व ग्रामसेवक यांनी व्यापारी संघटनेच्या सहकार्याने तातडीने उपाययोजना करावी. नियमित कचरा संकलन, निश्चित कचराकुंडीची व्यवस्था आणि रस्त्यालगत कचरा टाकणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई केल्यास ही समस्या नियंत्रणात आणता येईल. नागरिकांच्या आरोग्याबरोबरच वाहतुकीची सुरक्षितता लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे ॲड. राकेश नारायण पाटील यांनी म्हटले आहे.