ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन


मुंबई (प्रतिनिधी) : ‘वेलकम’, ‘गदर’ आणि ‘हम हैं राही प्यार के’ यांसह ५०० हून अधिक चित्रपटांमध्ये विविध व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे गुरुवारी निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. कर्करोगाशी झुंज देत असताना मुंबईतील नानावटी रुग्णालयात सायंकाळी सुमारे ७ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर मुश्ताक खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीत त्यांना कर्करोग असल्याचे निदान झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती, अशी माहिती त्यांचा मुलगा मोहसीन यांनी दिली.
पाच दशकांच्या प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीत त्यांनी सहाय्यक तसेच व्यक्तिरेखा भूमिकांमधून विशेष लोकप्रियता मिळवली. ‘आशिकी’, ‘दिल है कि मानता नहीं’, ‘सडक’, ‘जुनून’, ‘सर’, ‘गदर’, ‘वेलकम’ आणि ‘गदर २’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी ते सलमान खानचे बॉडीगार्ड शेराच्या मुलाच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्येही सहभागी झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.