अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषदेत शिक्षिकेची बदली करून देण्यासाठी तिच्या पतीकडून दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना स्वीय सहाय्यक योगेश भस्मे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडल्याने जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात भस्मे यांना अटक झाली असली, तरी लाचेची मागणी नेमकी कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली होती, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
भस्मे यांनी ही रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी मागितली होती की, त्यामागे अन्य कोणाची भूमिका होती, याचा सखोल तपास होणे आवश्यक असल्याचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी म्हटले आहे. एसीबीच्या तपासातून या प्रकरणातील संपूर्ण साखळी समोर येणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसारखी प्रक्रिया ही प्रशासकीयदृष्ट्या संवेदनशील असते. त्यामुळे या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अनधिकृत हस्तक्षेप झाला आहे का, याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी केली. संबंधित कागदपत्रे, फाईलची हालचाल, आदेश व निर्णय प्रक्रिया यांचा तपशील तपासण्याबरोबरच या प्रक्रियेशी संबंधित सर्व व्यक्तींची भूमिका पडताळून पाहणे गरजेचे आहे.
दरम्यान, एसीबीच्या कारवाईनंतर जिल्हा परिषदेतील लाचखोरीच्या प्रकारावरून प्रशासकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे केवळ लाच स्वीकारणाऱ्या व्यक्तीपुरता तपास मर्यादित न ठेवता, लाचेची मागणी आणि बदलीच्या निर्णयामागील संपूर्ण प्रक्रियेचा तपास करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.









