उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन; शेकापचा पाठिंबा – जयंत पाटील यांची माहिती
अलिबाग (प्रतिनिधी): निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत संयुक्त जनमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून, या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
मतदार यादीतील नावे, निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत मुंबईत संयुक्त मोर्चाची घोषणा केली आहे. विविध विरोधी पक्ष आणि संघटनांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
४ ऑक्टोबर रोजी सकाळी मुंबईतील भायखळा परिसरातून मोर्चाला सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, मोर्चाचा मार्ग आणि ठिकाण याबाबत मुंबई पोलिसांच्या सूचनांनंतर बदल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार मोर्चा पेटिट सिनेमा परिसरातून मुंबई महापालिका मुख्यालयाकडे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या मोर्चामध्ये सहभागी होताना कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे न वापरता केवळ तिरंगा हातात घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया, एफआयआर तसेच मतदार यादीशी संबंधित विविध मुद्द्यांवरून हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याचे ठाकरे बंधूंकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, शेतकरी कामगार पक्षाने या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे ४ ऑक्टोबरच्या मुंबईतील संयुक्त जनमोर्चात विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचा सहभाग किती राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.









