अलिबाग (प्रतिनिधी) : श्रीबाग परिसरातील एका इमारतीतून बाहेर पडणारे सांडपाणी थेट रहदारीच्या रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या समस्येबाबत वारंवार नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊनही योग्य ती कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. अखेर नगरसेवक ॲड. श्वेता संदीप पालकर आणि ॲड. संदीप जनार्दन पालकर या पालकर दाम्पत्याने स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि ही समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली.
श्रीबाग येथील संबंधित रस्त्यावरून नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. या परिसरात शाळा, जैन मंदिर तसेच न्यायालय असल्याने या रस्त्याचा वापर विद्यार्थी, भाविक, नागरिक आणि न्यायालयीन कामासाठी येणारे लोक नियमितपणे करतात. अशा महत्त्वाच्या रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्याने परिसरातील स्वच्छतेचा आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना दुर्गंधी व अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत होता.
या समस्येबाबत नगरपरिषद प्रशासनाला वारंवार कळवूनही दखल घेतली जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत होती. ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक पालकर दाम्पत्याने आज स्वतः घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. संबंधित समस्येची माहिती घेत त्यांनी हे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची आणि नागरिकांना दिलासा देण्याची खात्री दिली.
नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करणे आणि समस्येच्या निराकरणासाठी पुढाकार घेणे, या भूमिकेचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले.नगरसेवक पालकर दाम्पत्याच्या या तत्परतेबद्दल नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
आता अलिबाग नगरपरिषद प्रशासनानेही या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन सांडपाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.








