अलिबागच्या लीलॅक हॉटेलच्या किचनमध्ये आग; सुदैवाने जीवितहानी टळली


अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण; हॉटेलचे नुकसान

अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग शहरातील लीलॅक हॉटेलच्या किचनमध्ये गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत हॉटेलचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अलिबाग नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, लीलॅक हॉटेलमधील कर्मचारी नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त असताना सायंकाळच्या सुमारास किचनमध्ये अचानक आग लागली. वीजपुरवठा करणाऱ्या वायरने पेट घेतल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. सुरक्षिततेच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांनी तातडीने हॉटेलबाहेर धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच अलिबाग नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, या घटनेत हॉटेलचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, अलिबाग नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे यांनी नगरसेवकांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अचानक लागलेल्या या आगीमुळे हॉटेल परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
आगीचे नेमके कारण आणि झालेल्या नुकसानीचा तपशील अधिकृत तपासानंतर स्पष्ट होईल.