माजी आमदार पंडितशेठ पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांचे आश्वासन
अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील ग्रुप ग्रामपंचायत गोवेअंतर्गत मौजे गोवे येथील गट क्रमांक ३८ मधील रखडलेल्या शासकीय भूखंड वाटपाचा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सन १९९१ मध्ये शासनाने मंजूर केलेले भूखंड मिळावेत, यासाठी स्थानिक सर्वसामान्य आणि गरजू नागरिक गेल्या ३५ वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. या प्रदीर्घ लढ्याला आता महायुतीच्या माध्यमातून सकारात्मक दिशा मिळाली असून, प्रलंबित भूखंड वाटपातील तांत्रिक अडचणी दूर करून नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिले आहे.
या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी पुढाकार घेतला. गोवे ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची समस्या लक्षात घेऊन त्यांनी हा प्रश्न थेट वरिष्ठ राजकीय नेतृत्व आणि प्रशासनाच्या पातळीवर मांडला. पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा घडवून आणत भूखंड वाटपातील अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला.
पालकमंत्र्यांची सकारात्मक भूमिका
गोवे गावातील गट क्रमांक ३८ मधील शासकीय भूखंड वाटपाचा प्रश्न बैठकीत मांडण्यात आला. ग्रामस्थांची गरज आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न लक्षात घेऊन पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी सकारात्मक भूमिका घेतली. भूखंड वाटपाच्या प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून दिला जाईल, तसेच हा प्रश्न पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश
या प्रश्नाच्या सोडवणुकीला प्रशासकीय गती देण्यासाठी अपर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत रोहा येथील प्रांत कार्यालयाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, या प्रकरणातील वस्तुस्थिती तपासून सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून रखडलेल्या भूखंड वाटपाच्या प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांमध्ये आशेचे वातावरण
सन १९९१ मध्ये मंजुरी मिळूनही भूखंड प्रत्यक्ष ताब्यात न मिळाल्याने गोवे येथील अनेक नागरिकांना वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे या प्रश्नावर ठोस निर्णय होऊन भूखंड वाटपाची प्रक्रिया पूर्ण व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
माजी आमदार पंडितशेठ पाटील यांच्या पुढाकारामुळे आणि पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे या प्रश्नाच्या निराकरणासाठी महत्त्वाचे पाऊल पडल्याचे मानले जात आहे. आता प्रशासनाकडून सात दिवसांत सादर होणाऱ्या अहवालानंतर पुढील कार्यवाहीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
गोवे ग्रामस्थांच्या हक्काच्या भूखंडांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल पालकमंत्री भरतशेठ गोगावले आणि सातत्याने पाठपुरावा करणारे माजी आमदार पंडितशेठ पाटील यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
३५ वर्षांची प्रतीक्षा संपून गोवे ग्रामस्थांना त्यांच्या हक्काचे भूखंड प्रत्यक्ष मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.









